बाबासाहेबांच्या बद्दल कदाचित काही गोष्टी तूम्हाला माहीत असतील आणि काही नव्याने माहित होतील... तर जाणून घेऊया त्या बद्दल. 

  • बाबासाहेब हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. 

  • दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.

  • महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व फारसी विषयांत शेकडा ७५ पेक्षा जास्त गुण मिळत असे. तेथे इंग्लिशचे प्राध्यापक मुलर व फारसीचे प्राध्यापक के.बी. इराणी हे आंबेडकरांचे शिक्षक होते.

  • मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते

एम.ए. च्या पदवीसाठी भीमरावांनी एन्शंट इंडियन कॉमर्स (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून तो १५ मे, १९१५ रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. २ जून, १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए.ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर अ‍ॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी नावाचे प्रकाशित करण्यात आला.


आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करुन अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी फेब्रुवारी, १९१६ मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. 

कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. "डॉ. भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे" असे त्या परिचयपत्रात सीगर यांनी लिहिले होते.

आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचेही विद्यार्थी वर्गात येऊन बसत असत.

इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तो आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिण्यात यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला.

जातिसंस्था मनूने निर्माण केली हे डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. आंबेडकरांच्या मतानुसार, 'मनूने जातीचा कायदा सांगितला नाही. तो ते करू शकता नव्हता. मनूपूर्वी कित्येक वर्षे जातिसंस्था अस्तित्वात होत्या. स्मृतिकार मनूने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची संहिता बनवून, त्याला तात्त्विक आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.


  • आंबेडकरांना पहिली केस म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूंची केस मिळाली.

ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेधे, रांमचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर "देशाचे दुश्मन" हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरुन खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून ऑक्टोबर १९२६ मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली. 

शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील व्यापारी चंदुलाला सरूपचंद शहा यांच्याविरुद्ध १९३०च्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितला व दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहणाऱ्या डॉ. आंबेडकरांना भेटण्याचे सांगितले. पुढची तारीख कोणती आहे हे विचारुन डॉ. आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यांनी ठाणे येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. 

वाशिंद येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मलबारी यांनी दान केलेली आहे.

  • इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत. हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात 'पाठ्यपुस्तक' म्हणून वापरले जाते.

२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणाले की तूम्ही शूर वीरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात.
 
शिवजयंती व गणेशोत्सवात सहभाग
३ मे १९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. बहिष्कृत भारत च्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले. रात्री शिवाजी महाराजांची पालखी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करुन आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.

दादर बी.बी.सी.आय. रेल्वे स्थानकाजवळच्या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या व्यवस्थापक मंडळाने इ.स. १९२७ च्या गणेशोत्सवात आंबेडकरांचे भाषण आयोजित केले. आंबेडकरांनी आपल्या भाषणात विविध देशांच्या व भारताच्या इतिहासाचे दाखले देत सांगितले की, "हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल, जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करु शकेल आणि स्पृश्यास्पृश्यभेद संपवून समानतेचे व माणुसकीचे वर्तन करू लागेल."

मनुस्मृतीचे दहन
"ते (मनुस्मृती दहन) एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदुंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वतः समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ एक मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!"
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इ.स. १९३८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत मनुस्मृती दहनाच्या प्रतीकात्मक स्वरूपावरील विधान

हरिजन' शब्दाला विरोध
महात्मा गांधी अस्पृश्यांसाठी 'हरिजन' ही संज्ञा वापरत, जिचा अर्थ 'ईश्वराची लेकरे' असा होतो.[१३०] तसेच गांधी इ.स. १९३३ मध्ये 'हरिजन' नावाचे एक नियतकालिकही चालवत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी "अस्पृश्य हे 'हरिजन' असतील तर उरलेले लोक 'दैत्यजन' आहेत काय?", असा सवाल करत.

"आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे."

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, २ मार्च १९३० रोजी केलेले भाषण

  • काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.

देशात घडणारे दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत. दुष्काळ हटवायचा तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे. जिरायती शेती, बागायती करण्याचे प्रयत्न वाढवावेत. शेती व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, असे मौलिक विचार त्यांनी मांडले. पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला, नदीच्या खोर्‍यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने १९९६ मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोर्‍यांची विभागणी केली. यावरून डॉ. बाबासाहेब यांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली होती. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारंभास अनेक देशांचे प्रतिनिधी, भिक्खू संघ व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता.
इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या. अशी आग्रही मागणी डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख बाबासाहेबांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.


द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम
सन २००४ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांचा सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून सन्मान केला. इ.स. २००४ मध्ये आपल्या स्थापनेला २५० वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात आजपर्यंत शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा शंभर सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची 'द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम' नावाने एक यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात 'भीमराव आंबेडकर' हे नाव पहिल्या स्थानावर होते. यावेळी विद्यापीठाने आंबेडकरांचा उल्लेख "आधुनिक भारताचा निर्माता" असा केला होता.

  • गुगल डुडल
गुगलने १४ एप्रिल २०१५ रोजी आपले मुख्यपृष्ठ डुडलच्या माध्यमातून आंबेडकरांचा १२४वा जन्मदिवस साजरा केला होता. हे डुडल भारत, अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम या देशांमध्ये चित्रित करण्यात आले होते.


  • ट्विटर इमोजी
इ.स. २०१७ मध्ये, १२६व्या आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी तयार करून आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.

तूम्हाला आमचे लेख कसे वाटतात ते जरूर कळवा आवडल्यास लाईक आणि शेयर करा. 
जय भीम !!