आपल्या सर्व वाचकांना सप्रेम जय भीम.
बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन हा आंबेडकर जयंती एक उत्सव म्हणून हा संपूर्ण भारतभर साजरा केला जातो, तर देशातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुटी असते. जगातील अनेक देशांत सुद्धा दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी होते. महाराष्ट्रात आंबेडकर जन्मदिन "ज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाने इ.स. २०१७ मध्ये आंबेडकर जयंती 'ज्ञान दिन' म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला.
अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सन २०१६, २०१७ व २०१८ या वर्षांमध्ये आंबेडकर जयंती साजरी झालेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने बाबासाहेबांचा 'वैश्विक प्रणेता" म्हणून गौरव केला आहे.
बाबासाहेबांच्या जयंती व्यतिरिक्त अन्य काही दिवस भारतात साजरे केले जातात जाणुन घेऊ त्याबद्दल....
समर्पित विशेष दिवस
• ७ नोव्हेंबर हा बाबासाहेबांचा शाळा प्रवेश दिवस महाराष्ट्रामध्ये 'विद्यार्थी दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाने हा निर्णय २७ ऑक्टोबर २०१७ रोजी घेतला.
बाबासाहेब हे आदर्श विद्यार्थी होते, ते विद्वान असूनही त्यांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात आंबेडकरांच्या विविध पैलूंवर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
• बाबासाहेबांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन (राष्ट्रीय विधी दिन) २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.
• भारत सरकारने बाबासाहेबांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.
• संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.
• बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ ५ जुलै हा दिवस 'लॉयर्स डे' (वकील दिन) म्हणून साजरा केला जातो. आंबेडकरांनी ५ जुलै १९२३ रोजी वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती.
• बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी 'मनुस्मृती' या ग्रंथाचे जाहिरपणे दहन केले होते. त्यामुळे '२५ डिसेंबर' हा दिवस 'मनुस्मृती दहन दिन' म्हणून पाळला जातो.
• बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे 'बौद्ध धर्म' स्वीकारला होता व तसेच लाखो लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. त्यांच्या या कृतीमुळे बौद्ध धर्माचे प्रवर्तन झाले त्यामुळे 'अशोक विजयादशमी' किंवा १४ ऑक्टोबर हा दिवस 'धम्मचक्र प्रवर्तन दिन' म्हणून साजरा केला जातो.
• बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाडचा सत्याग्रह केला होता. त्यामुळे २० मार्च हा दिवस "सामाजिक सबलीकरण दिन" म्हणून साजरा केला जातो.
तुम्हाला आमचे लेख कसे वाटतात ते जरूर कळवा आणि आवडल्यास लाईक, शेयर करत रहा.
जय भीम!!







0 टिप्पण्या